‘शेतकरी आत्महत्या’ माहिती | Farmer suicide | India

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो मला सांगा आपला महाराष्ट्र कशामध्ये पुढे नाही? कलाक्षेत्र म्हणू नका,शैक्षणिक क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, अगदी सामाजिक क्षेत्र, त्याचबरोबर शेतकऱ्यांची आत्महत्या??!!! का?  हे वाचून धक्का बसला का?  आपल्या महाराष्ट्र तथा भारतामध्ये  शेतकरी आणि आत्महत्या हे जणू समीकरणच तयार झालेलं आहे. दिवसागणिक शेतकरी आत्महत्येच्या घटना आपण रोज वाचत असतो बघत असतो. सरकारने किती जरी उपायोजना आणल्या तरी सुद्धा शेतकऱ्यांची आत्महत्या काही कमी होत नाहीये. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण 1995 ते 2018 या वर्षांमध्ये जवळपास चार लाख शेतकऱ्यांनी भारतामध्ये आत्महत्या केल्या आहेत. आणि आश्चर्याची बाब म्हणजे याच्यात आघाडीवर आपलाच महाराष्ट्र आहे.

मित्रांनो तुम्ही कोणत्याही वृद्धाश्रमाला जर कधी भेट दिली, आणि तिथे असलेल्या कोणत्याही वृद्ध जोडप्याला जर प्रश्न विचारला की तुमची मुलं सध्या काय करतात? यावर ते वृद्ध जोडपं तुम्हाला उत्तर देईल की माझा मुलगा डॉक्टर आहे, इंजिनियर आहे,वकील आहे,उद्योगपती आहे, पण त्या वृद्धाश्रमात खितपत पडलेलं एकही जोडपं तुम्हाला असं नाही म्हणणार की माझा मुलगा अडाणी शेतकरी आहे !!! कारण अडाणी शेतकऱ्याचे आई-वडील कधीच वृद्धाश्रमांमध्ये पोहोचत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. मग त्याच्यावर कितीही संकट येउदे. पण अलिकडे याचं समीकरण बदललेलं दिसतय, तोच शेतकरी आत्महत्येचे मोठं पाऊल उचलताना दिसतोय.

बऱ्याच वेळा तुम्ही तुमच्या मोबाईल फोन वर, बऱ्याच व्हिडिओज मध्ये, व्हाट्सअप च्या स्टेटस वर, शेतकरी इज ब्रँड, Brand is Brand, वावर हाय तर पावर हाय, त्याचबरोबर पैशाचे बंडल दाखवत शर्टाची कॉलर टाईट करत शेतकरी म्हणून घेणारे, श्रीमंत किंवा गडगंज संपत्ती असलेले शेतकरी बघितले असतील. पण मग हे आत्महत्या करणारे शेतकरी म्हणजे नेमके कोण? असा विचार तुमच्या कधी मनात आला आहे का? किंवा एक गरीब शेतकरी जे कर्जबाजारी झाल्यामुळे आत्महत्येचे पाऊल उचलतात आणि पैशांचा माज करत फॉर्च्युनर गाडी मध्ये फिरणारे श्रीमंत शेतकरी यांच्यात एवढी तफावत का आहे? याचं मूळ उत्तर आहे, फरक!! काही गरीब शेतकरी ज्यांची जमीन फारच छोटी आहे, किंवा ज्यांचे उत्पन्नाचं साधन फक्त शेती आहे, अशांच्या पिकांचे जर नुकसान झालं तर त्यांच्या घरात देखील शिजवायला अन्न उरत नाही, आणि मग यांना अखेरचा पर्याय दिसतो तो म्हणजे आत्महत्या  !! त्याचबरोबर ज्यांची शेतजमीन भरपूर एकरात असते शेतीबरोबरच ज्यांचा काही जोडधंदा असतो, अशांना पिकांचे नुकसान झाले तरी जास्त फरक पडत नाही, किंबहुना ते तसं तोंडावर दाखवत तरी नाही.

हा तोच शिवाजी राजांचा महाराष्ट्र आहे ज्याच्या काळात रयत सुखी, होती शेतकरी राजा सुखी होता. महाराजांच्या काळात कोणत्यातरी शेतकऱ्याने आत्महत्या केली असेल,असे माझ्या तरी ऐकिवात नाही. पण काळानंतर असं काय झालं ज्याने अचानक महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या? “ ईडा पिडा टळुदे आणि बळीचं राज्य येऊ दे “, असं म्हणायला देखील लोक घाबरू लागली.

 

पूर्वी कसा पाऊसकाळ चार महिने असायचा,

हिरवगार रान पाहून माणूस खुशीत असायचा,

एवढ्या तेवढ्या पावसा वाचून सारंच चित्र पालटलय,

गाव पण हरवल्यानं माणूसपण गारठलंय  !!!

बऱ्याच शेतकऱ्यांना पावसामुळे शेतीचे नुकसान सहन करावं लागतं, बऱ्याच शेतकर्‍यांची तर मुद्दल सुद्धा निघू शकत नाही, मग अशावेळी सावकाराचं डोक्यावर असलेलं कर्ज त्यांना सतावत राहतं, आणि मग त्यांना शेवटचा पर्याय दिसतो तो म्हणजे आत्महत्या ?? देवाने दिलेले हे अनमोल आयुष्य फक्त एकदाच मिळतं, पण शेतकरी एवढा खचून जातो की त्याला हे एकदाच मिळणार आयुष्य सुद्धा नको वाटायला लागतं.

आज आभाळ फाटलं,

श्वास उरात गोठलं,

घर -शेतामध्ये पाणी,

आणी उभ्या पिकात साठलं,

दुःख सांगाव कोणाला पाणी डोळ्यात आटलं !!

मित्रांनो शेतकऱ्याच्या आत्महत्या ला आपण सर्वजण जबाबदार आहोत, अरे जो जगाचा अन्नदाता आहे, त्याला आपण किती सांभाळलं पाहिजे, सावरलं पाहिजे, आधार दिला पाहिजे, पण इथे ते सर्वच उलट चालू आहे. एखाद्या बोक्याची जशी उंदरावर नजर असते तशी सत्तेच्या खुर्चीवर नजर असलेले लाचार राजकारणी शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाहीत. पण जेव्हा निवडणूक जवळ येते तेव्हा मात्र दारामध्ये भीक मागायला येतात, आणि एकदा का निवडणूक संपल्यावर पुढच्या पाच वर्षांसाठी ह्या शेतकऱ्यांकडे ढुंकून सुद्धा बघितलं जात नाही

अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान, शेतकऱ्याच्या मालाला योग्य हमीभाव मिळवून देणे, एखादा रोग येऊन पीक नासले, तर त्याचे अनुदान, इत्यादी सर्व गोष्टी सरकारने दिल्या पाहिजेत. पण या सर्व गोष्टींकडे अगदी कटाक्षाने दुर्लक्ष केले जातं, आणि मग जेव्हा अशी कोणती वाईट परिस्थिती शेतकऱ्यावर येते तेव्हा मात्र शेतकऱ्याकडे आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांवर अशी कोणती वेळ येईल त्या त्या वेळेस सरकारने पुढाकार घेऊन कर्जमुक्ती दिलीचं पाहिजे.

जेव्हा एखाद्या शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान होते, ही बातमी जेव्हा त्याच्या नातेवाईक, मित्रमंडळी,आणि आजूबाजूच्या लोकांना समजते, तेव्हा ती लोकसुद्धा त्या शेतकऱ्याला मदत करायला काचकूच करतात. खरंतर अशा वेळेस पुढाकार घेऊन आपल्याला जमेल तशी मदत आपण शेतकऱ्याला केली पाहिजे आणि हीच खरी वेळ असते जिथे

त्याला पुन्हा एकदा उभं केलं पाहिजे. आणि आपण जर हे कार्य केलं नाही तर शेतकऱ्याचा मुलगा पुन्हा कधीच शेतकरी होऊ शकणार नाही. आणि जर कुणी शेतकरी झालंचं नाही तर तुम्ही,आम्ही काय खाल ?? जगाच्या या पोशिंद्याला वाचविण्याची हीच खरी वेळ आहे.

पुढे जाऊन मी शेतकऱ्यांना एवढेच म्हणेल की, आत्महत्या करणारा माणूस तर निघून जातो पण त्यानंतर, खरं मोठं संकट तर त्याच्या घरच्यांवर, बायकोवर मुलाबाळांवर येतं. जर घरामध्ये कमावणारा एकटाच व्यक्ती असेल आणि त्यानेच जर आत्महत्या केली तर मात्र त्या कुटुंबाची जास्त परवड होते. अरे आत्महत्या करायला कसली आलीये हिम्मत ?? खरी हिम्मत तर त्यात आहे जो अपयशाला न घाबरता, टिकून राहून जगून दाखवतो.

शेतकऱ्यांनो काय आत्महत्या करणे हाच शेवटचा पर्याय असू शकतो? जर असंच असतं तर, जेव्हा मुघलांचं काळं आभाळ या महाराष्ट्रावर पसरलं होतं तेव्हा, मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन, चारी मुंड्या चीत करत, हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले असते का? बत्तीस वर्ष छातिचि ढाल करून 140 लढाया लढून सर्वच्या सर्व जिंकणारे छत्रपती संभाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य अबाधित ठेवता आलं असतं का? अरे आपल्यापेक्षा हजारो-लाखो पटींनी संकट तर त्या लोकांना आली, पण परिस्थितीसमोर हताश न होता, खचून न जाता, संकटाच्या छाताडावर पाय देऊन जे उभे राहिले तेच खरे छत्रपती आणि त्यांचे मावळे….!! तुम्हीसुद्धा त्याच शिवरायांच्या भूमीतले आणि मावळ्यांचे वंशज, असं खचून जाऊन कसं चालेल? त्यामुळे परिस्थितीवर मात करायला शिका.

शेवटी मी शेतकऱ्यांना एकच सांगेन, की आपल्याला देवाने दिलेले आयुष्य अनमोल आहे, त्यामुळे एकदा नाही हजारदा आत्महत्या करायच्या अगोदर विचार करा. तुम्ही जर आत्महत्या केली तर तुमच्या म्हाताऱ्या आई-वडिलांकडे कोण बघेल? लहान लहान मुलाबाळांकडे कोण बघेल ? त्यामुळे परिस्थितीसमोर खचून न जाता पुन्हा एकदा उभारी घ्यायला शिका. जिथे जिथे इच्छा असते तिथे मार्ग हा निघतोच, वाईट वेळ सुद्धा कधीच कायमची नसते, ही देखील निघून जाते. त्यामुळे भावनांच्या आहारी जाऊन आत्महत्येचं मोठं पाऊल कधीच उचलू नका.

पोटासाठी घाटाघाटाततून पिळवटलेल्या वाटा,

तापलेली माती पायी बोचलेला काटा,

सुकलेलं ओठ आटलेलं पोट,

अन डोईवरून सूर्य ओकतो,

जिव्हाळेचा लोट,

गायी गोठे सपाट झाले, सपाट झाल्या राशी,

कत्तलखाने रंगून गेले चीपाट दुभत्या म्हशी,

कोणाचा जीव घुटमळतो तर कोणाच्या गळ्यात फाशी?

हे समदं घडतंय ज्या देशात मथुरा काशी  !!!

Matathi Charoli

आम्ही तुमच्या सर्वांसाठी मराठी भाषेत स्टेटस कोट्स आणि शेरो शायरी आणत आहोत, तुम्ही आमच्यासोबत सामील होऊ शकता आणि तुमच्या मित्रांसह आणि तुमच्या कुटुंबियांसोबत शेअर करू शकता आणि आयुष्यातील खूप वेगळे आनंदाचे क्षण व्यक्त करू शकता- तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या नोट्स वाचू शकता आणि त्या डाउनलोड करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: