दुराचारी भक्त

फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. ‘इरास’ देशात ‘विमर्शन’ नावाचा राजा होता. तो पराक्रमी होता. पण दुराचारी होता. तो मांसाहार करी. अति मद्य सेवन करी. त्याने अनेक स्त्रियांशी विवाह केला होता. त्यात ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय व शूद्र स्त्रियाही होत्या. तो शीलभ्रष्ट होता. पण त्याचे मोठे वैशिष्ट्य म्हणजे तो शंकराचा भक्त होता. तो नित्यनेमाने शिवभक्तीत मग असे. त्याची पत्नी ‘कुमुद्वती’ बुद्धिमान होती. पतीचा विषयासक्तपणा तिला आवडत नसे. एक दिवस ती पतीला म्हणाली, “तुम्ही शंकराची पूजा करता, व्रतवैकल्ये व उपास करता. पण तुमच्या हातून कितीतरी पापे घडतात.”

राजा म्हणाला, “खरे आहे तुझे म्हणणे. पण माझ्या पूर्वजन्मीचे वृत्त तू ऐकलेस म्हणजे तुला याचा उलगडा होईल. गेल्या जन्मी मी पंपानगरीत एक कुत्रा म्हणून फिरत होतो. योगायोगाने मी शंकराच्या मंदिरासमोर गेलो. तेथे एक राजा शिवपूजा करत होता. मला पाहून राजाच्या सेवकांनी मला काठीने मारले. जीव घेऊन पळताना मी शंकराच्या मंदिराला प्रदक्षिणा घातली आणि आशाळभूतपणे काही खायला मिळेल या आशेने पुन्हा तेथे गेलो. सेवक मला पुन्हा हाकलायला धावले. देवळाला आणखी एक फेरी मारली व खूप भूक लागल्याने पुन्हा मंदिरासमोर येऊन बसलो.

मला पाहताच सेवकाचा राग अनावर झाला.” “हे कुत्रे जर पुन्हा येथे आले तर माझी नोकरीच जाईल.” तो दुसऱ्या सेवकाला म्हणाला. दातओठ खात त्याने धनुष्याला बाण लावला आणि माझ्यावर सोडला. वेगाने आलेला तो बाण माझ्या मस्तकात घुसला. मी शंकराच्या पिंडीकडे पाहत आचके देत प्राण सोडला.” “कुमुद्वती, अशा प्रकारे शिवरात्रीच्या दिवशी मला उपोषण घडले. माझ्या शिवाला प्रदक्षिणा झाल्या. त्यामुळे मला राजवैभव मिळाले. पण गतजन्मीच्या कुत्र्याचे दोष अजून माझ्यातून गेलेले नाहीत.” “नाथ, तुम्हांला तुमचा पूर्वजन्म आठवतो?” “होय, चांगलाच आठवतो.”

“मग मी पूर्वजन्मी कोण होते सांगाल?” राजा म्हणाला, “तू पूर्वजन्मी कबूतर होतीस. मांसाचा एक छोटा तुकडा चोचीत धरून तू आकाशातून उडत चालली होतीस. एका बहिरी ससाण्याने तुझा पाठलाग केला. तू पळून जाण्यासाठी शिवमंदिरासभोवती घिरट्या घालू लागलीस. पण त्या ससाण्याने तुला गाठलेच व एका फटक्यात आकाशातच ठार मारले.

तेव्हा तू वरून शिवलिंगासमोरच येऊन पडलीस. म्हणून तुला राणीपद मिळाले.” राणी चकित झाली. तिने विचारले, “आपण पुढच्या जन्मी कोण होऊ?” राजा म्हणाला, “सांगतो. पुढच्या जन्मी मी सिंधू देशाचा राजा होईन. तू माझी पत्नी होशील. तुझे नाव जया असेल. त्यापुढील जन्मात मी सौराष्ट्र देशाचा राजा होईन. तू कलिंग देशाची राजकन्या होशील व मला वरशील.

चौथ्या जन्मात मी गांधार देशाचा राजा व तू मगध देशाच्या राजाची कन्या. पाचव्या जन्मात मी अवंती नगरीचा राजा व तू दाशाह राजाची कन्या असशील. सहाव्या जन्मात मी अनर्त देशाचा राजा व तू ययातीची वंशज होशील. सातव्या जन्मात मी पांड्य राजा व तू पन देशाची राजकन्या होशील. या सर्व जन्मात तुझा माझ्याशीच विवाह होईल.

शिवशंकराची माझ्यावर कृपा असेल, त्या जन्मात मी पुत्राला राज्य देऊन तपासाठी वनात जाईन. त्या जन्मी आपण दोघे शिवलोकी जाऊ. शिवभक्तीचा महिमा इतका मोठा आहे. त्याचे वर्णन बह्मदेवासही करता येणार नाही. इतके दोष असूनही ‘विमर्शन’ राजा आपल्या सुंदर पत्नीसह शिवलोकी गेला. त्याचे सर्व जन्म शिवभक्तीमुळे सफल झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: