एकता ही शक्ती आहे
बुद्धांच्या काळात मगधचा राजा ‘अजातशत्रू’ हा एक अतिशय पराक्रमी राजा म्हणून प्रसिद्ध होता. अजातशत्रूला बुद्धांविषयी खूप आदर वाटायचा. तो वेळोवेळी, आवश्यक वाटेल तेव्हा बुद्धांचा सल्ला घ्यायचा. शेजारच्या ‘वैशाली’ नगरातील वजींचा पराभव करून वैशाली नगर जिंकायची त्याची खूप इच्छा होती. पण वजींसोबत झालेल्या युद्धात तो जिंकू शकला नाही. एकीच्या बळावर वजींनी अजातशत्रूचा पराभव केला. तेव्हा अजातशत्रू थोडा निराश झाला.
एके दिवशी त्याने आपला ‘महाअमात्य असलेल्या ‘वस्सकार’ नावाच्या ब्राह्मणाला बोलावून घेतले. वस्सकाराला आदेश देत तो म्हणाला, “वस्सकारा, तू तथागत बुद्धांकडे जा. त्यांना वंदन कर आणि मी त्यांची खुशाली विचारली आहे, असे सांग. तसेच मी वजींवर पुन्हा आक्रमण करणार आहे, याबद्दल त्यांना माहिती दे. यावर ते काय म्हणतात ? ते परत येऊन मला सांग.’ राजा अजातशत्रूच्या आदेशानुसार वस्सकार तथागतांकडे गेला आणि त्याने राजाचा निरोप त्यांना दिला.
बुद्धांनी त्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. त्यांनी आपले आवडते शिष्य आनंद यांना बोलावून घेतले आणि म्हणाले, ‘आनंदा, वजी एकजुटीने वागतात का? एकीने वागून मी सांगितलेले नियम पाळतात का?” त्यावर आनंद म्हणाले, ”होय, वजी तुम्ही सांगितलेले नियम पाळतात आणि ऐक्याने वागतात.” आनंद यांचे हे उत्तर ऐकून बुद्ध वस्सकाराला म्हणाले, ”हे वस्सकारा, मी वैशालीमध्ये असताना वजींना ऐक्य पाळणे, एकत्रित निर्णय घेणे, यासारख्या एकूण सात गोष्टींचा उपदेश केला होता.
जोपर्यंत वजी हे सात नियम पाळून आपल्यातील ऐक्य कायम ठेवतील, तोपर्यंत त्यांची वृद्धीच होईल, पराभव होणार नाही.” वस्सकाराने बुद्धांचे म्हणणे ऐकले आणि त्यांचा निरोप घेऊन तो अजातशत्रूकडे परतला. त्याने ही सर्व माहिती अजातशत्रूला सांगितली आणि वज्जींचा पराभव करणे कठीण असल्याचे सांगितले. हे ऐकून अजातशत्रू थोडा निराश झाला. तेव्हा वस्सकार म्हणाला, “महाराज, जोपर्यंत वजी बुद्धांनी सांगितलेले नियम पाळून ऐक्य राखतील, तोपर्यंत त्यांना हरवणे शक्य नाही. त्यामुळे वजींचं ऐक्य तोडून त्यांना हरवायचे असेल, तर त्यासाठी एकतर त्यांना लाच द्यावी लागेल, नाही तर त्यांच्यात फूट पडावी लागेल.”
वस्सकाराचे बोलणे ऐकून अजातशत्रू त्याला म्हणाला, “लाच द्यायची झाली, तर आपल्याला हत्ती, घोडे, पैसा इत्यादी गमवावे लागेल. त्यापेक्षा आपण त्यांच्यात फूट पाडण्याचा मार्ग निवडूया. पण वजींचे ऐक्य तोडण्यासाठी त्यांच्यात फूट तरी कशी पाडायची?’ वस्सकार धूर्त होता. त्याने विचार केला आणि म्हणाला, ”महाराज, त्यासाठी आपण एक खोटं नाटक करूया.”
अजातशत्रू आश्चर्याने म्हणाला, ”नाटक ? कसलं नाटक ?’ वरसकार म्हणाला, ”मी सांगतो तसं करूया. तुम्ही वजीसोबत युद्ध करण्याचा विषय आपल्या दरबारात मांडा, त्यावेळी मी तुम्हाला विरोध करेल आणि दरबारात वजींची बाजू घेईल, त्यांची स्तुती करेल, मग मी लपून वजींसाठी काही भेटवस्तू पाठवीन, त्या पकडून तुम्ही मला शिक्षा करा, माझे मुंडण करून, अपमान करून नगरातून माझी हकालपट्टी करा, तेव्हा मी चिडून तुमचा सर्वनाश करण्याची भाषा करत नगर सोडेल.
मग मी वजींना जाऊन मिळेल, हळूहळू मी त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्यात फूट पाडेल.” र वस्सकाराचे हे बोलणे ऐकून अजातशत्रू खूश झाला. पुढे जसे वस्सकाराने सांगितले होते, अगदी तसेच जाणीवपूर्वक घडविण्यात आले. अजातशत्रूने सर्वांसमोर अपमान करून वस्सकाराला आपल्या राज्याबाहेर काढले. ही बातमी वैशाली मधील वजींना कळली. आपली बाजू घेतल्यामुळे, आपली स्तुती केल्यामुळे वस्सकाराला हे सगळं सहन करावं लागलं. त्यामुळे आपण त्याला आश्रय द्यावा, असा विचार काही वज्जी करू लागले.
याउलट, वस्सकार धूर्त आहे, तो आपल्याला फसवेल, असे काही वज्जी म्हणायला लागले. वस्सकाराला राज्यात घ्यायचे की नाही यावर वाद सुरू झाला. तेव्हा वस्सकार वजींजवळ आला आणि म्हणाला, “तुमची बाजू घेतल्यामुळे, तुमची स्तुती केल्यामुळे मला माझं राज्य सोडावं लागलं. आता तुम्हीच मला आश्रय द्या. मी प्रामाणिकपणे तुमच्यासाठी काम करेल.”
अनेकांनी विरोध करूनही वजींनी त्याला महाअमात्य म्हणून नेमले. आता वस्सकार चांगल्या पद्धतीने काम करू लागला. थोड्याच दिवसांत सर्व वज्जींशी प्रेमाने वागून त्याने सर्वांचा विश्वास संपादन केला. आपल्या गोड बोलण्याने त्याने सर्वांना आपलेसे करून टाकले. वजींचे राजकुमार त्याच्याकडे शिक्षण घेऊ लागले. नगरातील सर्व वजींनी एकत्र जमावे, यासाठी वैशाली नगरीत नगारा वाजविला जायचा. नगाऱ्याचा आवाज ऐकून सर्व वज्जी एकत्र जमायचे. असेच एके दिवशी जमलेल्या वजींपैकी एका वजीला त्याने एका बाजूला बोलावून घेतले. ते बघून इतर वजींच्या मनात शंका निर्माण झाली.
एकट्याला बाजूला नेऊन वस्सकार त्या वजीला म्हणाला, “तुमचे तरुण शेती करतात का?” त्यावर तो तरुण वज्जी म्हणाला, “होय, आमचे तरुण शेती करतात.” वस्सकार त्या तरुण वज्जीला पुन्हा म्हणाला, ”दोन बैल वापरून शेती करतात का?” यावरही त्या तरुणाने ‘होय’ असे उत्तर दिले. इतके बोलून वस्सकार निघून गेला. हे सारं घडत असताना इतर सर्व वज्जी काहीशा संशयाने त्यांच्याकडे बघत होते. त्यांना काही चैन पडेना. वस्सकार त्या तरुण वज्जीला काय म्हणाला असेल, हे जाणून घेण्यासाठी सर्वजण त्या तरुण वजीकडे गेले आणि म्हणाले, ”आचार्य तुला काय म्हणाले?” त्या तरुणाने घडलेला सारा प्रकार सर्वांना स्पष्टपणे सांगितला.
इतरांना मात्र त्याच्या बोलण्यावर काही विश्वास बसेना. हा वज्जी आपल्यापासून नक्की काहीतरी लपवतोय, खोटं बोलतोय, असे सर्वांना वाटले. त्याच्याविषयी इतरांच्या मनात अविश्वास निर्माण झाला. असेच एके दिवशी वस्सकाराने दुसऱ्या एका तरुण वज्जीला एका बाजूला बोलावून नेले आणि म्हणाला, “आज तू काय जेवलास?” त्याने उत्तर दिल्यावर वस्सकार निघून गेला. हे बघून इतर सर्वांच्या मनात शंका निर्माण झाली. त्या वजीलाही इतरांनी विचारल्यावर त्यानेही पहिल्या सारखेच सगळे खरे-खरे सांगितले. पण विचारणाऱ्यांचा त्याच्यावर काही विश्वास बसेना.
‘आचार्य वस्सकार असा निरुपयोगी प्रश्न कशाला विचारतील? हा वजी नक्कीच खोटं बोलतोय’, असे इतर वज्जींना वाटले. मग या मुद्द्यावरून त्यांच्यात वाद झाला. आणखी एके दिवशी वस्सकाराने तिसऱ्या वजीला बाजूला नेऊन हळूच विचारले, “तुझी अवस्था खरोखरच वाईट आहे का?” त्यावर तो तरुण वजी रागावून म्हणाला, “तुम्हाला असं कुणी म्हटलं?” त्यांच्यात फूट पाडण्यासाठी वस्सकार म्हणाला, “अमुक वज्जीने मला हे सांगितलं.”
पुन्हा एकदा वस्सकाराने एका तरुण वज्जीला सर्वांपासून दूर नेले आणि त्याला हळच म्हणाला, “मी ऐकलंय ते खरं आहे का? तू खरोखरच भित्रा आहेस का?” तो वजी चिडून म्हणाला, “असं कोण म्हणालं?” वस्सकार उत्तरला, ”अमुक वज्जी मला तसं म्हणाला.” अशाप्रकारे जे कुणी म्हटलंच नाही, ते दुसऱ्यांना सांगून त्यांच्यात फूट पाडण्याचे, भांडणं लावण्याचे काम त्याने सतत तीन वर्षे केले. त्याच्या अशा कटकारस्थानांमुळे सारे वजी एकमेकांचा द्वेष करू लागले. त्यांच्यातील ऐक्य संपले. त्यांच्यात फाटाफूट झाली.
दररोज एकत्र जमणारे, सर्व मिळून निर्णय घेणारे, एकमेकांचा आदर करणारे वजी एकमेकांना पाण्यात पहायला लागले. वजींनी एकत्र जमावे, म्हणून नेहमीप्रमाणे नगरात नगारा वाजविल्यानंतर एकही वजी तेथे जमला नाही. त्यांचं हे असं वागणं बघून वस्सकाराला आता कळून चुकलं होतं, की वजींमधील ऐक्य आता पूर्वीप्रमाणे राहिलेले नाही. त्याने लगेच अजातशत्रूला निरोप पाठविला, ‘योग्य वेळ आलेली आहे.
वजींमध्ये ऐक्य उरलेले नाही. ताबडतोब हल्ला करा आणि जिंकून घ्या.’ निरोप मिळताच राजा अजातशत्रू आपल्या प्रचंड सैन्यासह वजींवर आक्रमण करण्यासाठी निघाला. ही बातमी वजींना कळली. सर्वांनी एकत्र यावे, म्हणून नगारा वाजविला गेला. परंतु ऐक्यभाव नसल्यामुळे एकमेकांचा द्वेष करणारे वज्जी एकत्र जमले नाही. अजातशत्रू जवळ आल्यावर सुद्धा नगारा वाजविला गेला.
पण एकही जण तिथे आला नाही. शेवटी अजातशत्रू आपल्या सैन्यासह नगरात घुसला, हल्ला केला आणि शूर वजींचा पराभव केला. अशाप्रकारे बुद्धांचा उपदेश न ऐकल्यामुळे, ऐक्यभाव न राखू शकल्यामुळे, परस्परांवर विश्वास न ठेवल्याने वजींचा पराभव झाला.
तात्पर्य/बोध – ऐकीव माहितीवर विश्वास ठेवू नये. चिकित्सा न करता, कुणी सांगितलेल्या गोष्टी खऱ्या मानू नये. एकमेकांवर विश्वास नसेल, तर संघटन यशस्वी होऊ शकत नाही. एकता ही शक्ती आहे.